पर्वणी
कचाकचा भांडून दोघेही शांत झाले…कशी काय प्रेमात पडले मी याच्या, बुद्धी भ्रष्ट झाली होती का माझी त्या वेळेस?? असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात नाचत होते, त्याच्याही डोक्यात थोडया फार फरकाने असलंच सुरू होतं..
प्रेमविवाह केला होता त्यांनी.. लग्नाला 2 वर्ष होऊन गेली, उशिरा लग्न केल्यामुळे दोघेही चाळीशीच्या जवळ पोचत होते, वयाचा विचार करता दोघांनी मूल न होऊ द्यायचा निर्णय घेतला होता..
पण दोघातले वाद वाढू लागले होते, क्षुल्लक कारणं सुद्धा पुरायची..”मी लग्नाआधी पण पित होतो हे तुला माहीत होतं तर का केलंस माझ्याशी लग्न??” अशा प्रकारची वाक्य त्याच्या तोंडून ऐकून ती आणखी कोसळत होती..त्याची बेभरवशाची नोकरी, कमी पगार,आणि विक्षिप्त स्वभाव, यामुळे नोकरी टिकत नव्हती. पैशावरून तर अजून वाद व्हायला लागले होते..
ती सतत टेन्शन मध्ये असायची.. घर आणि नोकरी सांभाळता सांभाळता तिला बरंच काही विसरायला होत होतं.. नकळत ती अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा विसरू लागली होती.. या सगळ्यामुळे आगीत तेल पडत होतं… तिच्या या विसरण्याला त्याने बेजबाबदार, निष्काळजी आणि अशीच बरीच विशेषणं दिली होती, त्यामुळे ती अजून खचत चालली होती, तिचा विसराळूपणा वाढत चालला होता, आणि त्याचं निदान अल्झायमर मध्ये झालं…
.. आता ती पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होती… त्यांची भांडणं, मतभेद, त्याचं रोज पिणं, या सगळ्याचा तिला विसर पडायचा, किंवा कधीतरी सगळं आठवून पुन्हा त्यांच्यात वाद व्हायचे, जेव्हा तिच्या काहीच लक्षात नसायचं तो दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी असायचा…आणि तो सुद्धा तिच्या या आजारामुळे निवळला होता.. तिच्या या अवस्थेला तो स्वतःला जबाबदार ठरवत होता..
“अरे तू कधी आलास,..तिच्या या प्रश्नामुळे त्याची समाधी भंग पावली…”हे काय आत्ताच, 10 मिंट झाली, तुला झोप लागली म्हणून मी ही जरा आराम खुर्चीत कलंडलो असं म्हणून त्याने डावा डोळा मिचकावला आणि दोघेही हसायला लागले.. थांब चहा टाकते, असं म्हणून ती किचन मध्ये गेली…
तो तिच्याकडे बघत राहिला..आजचा दिवस माझा आहे, माझे सगळे गुन्हे आज माफ आहेत, कारण आज तिला काहीच आठवत नाहीये , मी वापरलेले कटू शब्द, शिव्या, कधी उगारलेला हात, भरपूर दारू पिऊन घरी येऊन केलेला तमाशा, हे सगळं , यातलं काहीच तिला आज आठवत नाहीये, जेव्हा तिला हे सगळं आठवेल तेव्हा ती पुन्हा माझा तिरस्कार करायला लागेल, आणि मग पुन्हा ती माझ्यापासून लांब जाईल.
त्याला गदगदून आलं, देवापुढे हात जोडून उभा राहिला.. म्हणला..हे परमेश्वरा, नक्की काय मागू तुझ्याकडे, तिला बरं कर म्हणू की स्वार्थी होऊन तिला कायम असंच राहू दे अशी याचना करू, काय करू परमेश्वरा, काय करू…