निरागस वास्तव
तिची गडबड सुरू होती,डबा झाला, पिल्लू ची शाळेची तयारी झाली, त्याचं दप्तर, डबा, खाऊचा डबा, पाण्याची बाटली, सगळं सगळं तयार होतं…, वेळ बघितली, आणि तिची घाई वाढली,घड्याळ तिच्या नजरेत अगदी मॅरेथॉन मध्ये धावत होतं, ऑफिस ची वेळ गाठायची, लेट मार्क नको, म्हणजे मग त्यासाठी ट्रेन पण वेळेत मिळायला हवी, आणि आता त्यात भर म्हणजे नाइलाजाने तिने वेगळं घर भाड्याने घेतलं होतं, एकटी राहायला लागली मग तक्रार तरी कशी करणार ?
तिचं पिल्लू अजून झोपेत होतं, तिने पाच, सहा वेळा हाका मारून पण उठायला तयार नव्हतं. “काय करणार बिचारा.. माझ्या ऑफिस च्या वेळेमुळे याला पूर्ण झोप मिळत नाही, ऑफिस ला जायच्या आधी याला आई कडे सोडून मग जावं लागतं”, स्वतःशी पुटपुटत एकीकडे आवरणं सुरू होतं.
शेवटी तिने त्याच्या गोबऱ्या गालावर पापी घेतली आणि लाडाने त्याला हाक मारली, मन्या उठ ना, पटकन आवरून जायचं ना, आजीकडे,plz उठ,मला ऑफिस ला जायला उशीर होतो, पिल्लू बिचारं धडपडत उठलं,.. मन्या फक्त दात घासणार तुझे मी बरं का, दूध बिस्कीट आजीकडे गेल्यावर हं का, सॉरी हा बच्चू, असं म्हणून स्वतः च अपराधीपण लपवत तिने त्याचं सगळं आवरलं आणि दाराला कुलूप लावून त्याचा एक दिवसाचा संसार घेऊन आई कडे जायला निघाली, तिथे त्याला सोडलं, आणि जड अंतःकरणाने निघाली.
किती दिवस लपवून ठेऊ?आता रोज घरी आल्यावर हा विचारतो, बाबा कुठेय? येत का नाहीये तो? देवाघरी म्हणजे नक्की कुठे गेलाय?काल तर हट्टाला पेटला, चल आपण जाऊया भेटायला, इथेच कोपऱ्यावर देवबाप्पा च घर आहे, तिथेच असतो ना बाप्पा दिवसभर, मग जाऊ आणि विचारू, पण मला बाबा ला भेटायचं आहे, असे कितीतरी त्याचे बोबडे प्रश्न तिच्या डोळ्यासमोर नाचायला लागले..कसं सांगू त्याला, शेवटचं दाखवण्याइतकं सुद्धा त्याचं शरीर त्या अपघातात उरलं नव्हतं, आठवणी पाठलाग करतात म्हणून ते घर सुद्धा सोडलं, आणि काय काय सांगू आणि कसं समजावू याला.
या सगळ्या विचारात कधी ऑफिस आलं,किती वेळ गेला काही समजलं नाही, आता जरा अजून उसनं अवसान आणून अर्थातच कामात गर्क झाली…
दिवसभर ऑफिस चं काम, बॉस चा मूड, ट्रेन ची गर्दी, पिल्लाची काळजी,पुन्हा हाताशी घेऊन घराची वाट धरली..
आई चं घर जसजसं जवळ यायला लागलं तशी हिची धडधड वाढायला लागली, बेल वाजवली आणि आई दारातच, काय ठरवलं आहेस, पुन्हा विचारतोय, ती काही न बोलता घरात शिरली,पिल्लू धावत येऊन बिलगलं,ती म्हणाली, थाम्ब हं आलेच, आणि डोळ्यातलं पाणी लपवत किचन मध्ये गेली, पाठोपाठ तिची आई पण,अग आम्ही तरी काय करू आता??तूच सांग, नाही बघवत त्याचं रोज वाट पाहणं.. प्लिझ काहीतरी कर..
आई चं बोलणं ऐकून ही अजून खचली, बांध फुटला आणि ती आतल्या खोलीत गेली,अश्रूंना वाट करून दिली,शांत झाल्यावर आरशासमोर जाऊन उभी राहिली,..बस्स झालं ग, किती दिवस अजून, कधीतरी सांगायला लागणार ना, मनाशी काहीतरी ठरवलं तिने,डोळे पुसून बाहेर आली…
आणि …म्हणाली…
ऐ मन्या, काय झालं, माझ्या पिल्लाला, चला पटकन, बाबा ला भेटायला माझ्या सोबत कोण येणार,
कोपऱ्यावरच्या देव बाप्पाच्या घरी जाऊ,चल पक्कन…
त्या निरागस पिल्लाने ने काही शंका कुशंका न घेता आई च्या कुशीत झेप घेतली आणि निघालं वास्तव जाणून घ्यायला…