मुक्ती
तिला कशाचा थांग पत्ता नव्हता… किती वेळ बेशुद्ध होती.. हेही तिला ठाऊक नव्हते….
गर्दी दिसली होती डोळ्यांपुढे, आणि कसंबसं अवसान आणून वेड्यावाकड्या अवस्थेत उठून आपण उभे राहिलो…… मागे वळून न बघता….तसेच निघालो..कशाच्या तरी शोधात.. इतकंच जाणिवेत होतं….. …
शरीरात होणाऱ्या असह्य वेदना.. चालत असताना दोन पायांच्या मध्ये लोंबकळत असणारं काहीतरी… त्यातून.. पायावर ओघळणारे रक्त… त्यामुळें तिच्या वाटेवर उमटणारे आणि..तिच्या पाठीमागे उरणारे तिच्या पावलांचे फक्त ठसे… सगळं काही तिला जाणवत होतं…
तिला काय हवं हे तिला माहीत होतं..पण ते कधी मिळेल.. किंवा मिळेल की नाही…. आणि नाही मिळालं तर.. पुढे जगायचं हे असं?या अवस्थेत?…
सगळंच अनिश्चित… पण ती निघाली होती… मनाशी पक्कं ठरवून….
दुपार टळली होती…चालत ती खूप लांब आली होती… स्वार्थी माणसं, त्यांची गर्दी, गाव , शहर, सगळं मागे पडलं होतं.. क्षितिजाच्या टोकाला कुठेतरी…लांब सूर्यास्त होण्याची चिन्हं दिसू लागली होती…
चालत.. फरपटत ती एका झोपडी जवळ येऊन थांबली…
पण तिथे वस्ती नव्हती..फक्त ती एकच झोपडी होती.. आणि झोपडीच्या बाहेर हवेत. मात्र.. एक वेगळाच गंध होता…तिला त्या वासाने मळमळायला लागलं.. डोकं गच्च धरून ती झोपडी कोलमडली….काही सेकंदानी मान वर करून आजूबाजूला बघितलं.. तर भरपूर कपडे पडलेले होते.. विखुरलेले कपडे.. स्त्री, पुरुष, लहान मुले, सगळ्या प्रकारचे कपडे अक्षरशः इतस्ततः पसरलेले होते.. त्या कपड्यांचा तो वास असावा असे तिला वाटले…
ती पुन्हा उठून उभी राहीली…. आणि झोपडीच्या बाजूला पडलेल्या त्या कपड्यांजवळ जायला लागली . तसा तो उग्र दर्प आणखीच तिच्या नाकात शिरला.. कसंबसं नाकावर हात ठेऊन ती ते कपडे निरखून पाहू लागली .. त्यापैकी..एका शर्टाला तिचा पाय लागला.. तिच्या स्पर्शाने तो शर्ट जिवंत झाला… ती घाबरून मागे सरकली.. तो शर्ट दोन्ही हात पसरून तिच्या दिशेने धावून आला ..तो तिच्यावर हल्ला करणार इतक्यात.. मघाशी झोपडीच्या परिसरात दिसलेली मानवी आकृती तिच्या मदतीला धावून आली.. आणि हातात असलेल्या कोणत्यातरी वस्तूने त्या जाग आलेल्या शर्टाला त्या आकृतीने परतून लावले…..
तिने त्या आकृतीकडे बघितलं.. तो माणूस होता..बघून वयाचा अंदाज लागत नव्हता.. पण अनेक वर्षांपासून तिथे त्या जागेची राखण करत असावा असे तिला वाटले..
तो बोलू लागला..” तू तुझ्या इच्छित स्थळी पोचलीस..मुक्ती हवी आहे ना तुला.. जा.. मुक्त हो.. तुझं शरीर तू केव्हाच मागे सोडलं आहेस… पण आता इथून पुढे प्रवासात तुला काहीच त्रास होणार नाही.. जितकं भोगायचं होतं..ते सारं संपलं.. आता फक्त समोर दिसणाऱ्या होडीत जाऊन बैस.. आणि तुझा पुढचा प्रवास सुरू कर…जा.. सूर्यास्त व्हायच्या आधी जा…
त्याचं बोलणं ऐकून साऱ्या वेदना विसरून ती होडीच्या दिशेने भराभर पावलं टाकत जाऊ लागली…आता तिची पावलं मागे ठसे उमटवत नव्हती… तिला फक्त मुक्तीचा मार्ग.. दिसत होता… सारे आयुष्य भर्रकन डोळ्यासमोरून सरकले…
आता ती होडीपाशी होती… हलक्या पावलांनी ती होडीत बसली…आणि तिने..एकदा मागे वळून पाहिले..
तिथे ती झोपडी, उग्र वासाचे कपडे, तो राखणदार , झाडांचे प्रेत, … यापैकी काहीच नव्हतं…
तिला मागे दिसलं..ते फक्त कोणाच्या तरी वासनेपायी बळी पडलेलं , चोळा मोळा झालेलं तिचं गलितगात्र शरीर..