लॉक डाउन
सकाळी लवकरच बाहेर पडली होती ती…घरातलं बरंच सामान, जिन्नस संपलेत म्हणून आदल्या दिवशीच लिस्ट बनवून ठेवली होती…सकाळ झाल्यावर पिशव्या घेऊन घरी कोणाला काही न सांगता 8 वाजता दुकानासमोर रांगेत जाऊन उभी राहिली. अंग ठणकत होतं, चेहरा, डोळे झोंबत होते, रात्रभर झोप नाही, आराम नाही.. पण कर्तव्य करायलाच हवं…
तिचा नंबर आला तशी ती दुकानात शिरली, लिस्ट काढून एक एक वस्तू घ्यायला लागली.. जितकं गरजेचं आहे तितक्याच वस्तू घेतल्या तरी बिलाचा आकडा जरा मोठा दिसत होता..पण इलाज नव्हता, सगळं घेऊन , पैसे देऊन बाहेर पडली, आणि घरी जायला निघाली. घड्याळात 9 वाजले होते.
मनात विचार सुरू होते, आता घरी जाऊन काय?? बाहेर कुठे वेळ काढू शकत नाही, सगळं बंद आहे….ऑफिस ला जात होता तेव्हा जरा तरी बरं होतं, मी पण दमून यायचे, भांडायला वेळ मिळत नव्हता, 😄 हा सुद्धा आठवड्यातून 3 वेळा पिऊन, मग उशिरा घरी येऊन, झोपून जायचा…. पण आता…कालची उतरली असेल, याची, आणि मग आता भूकाळलेला असेल पण उठला तरी असेल का??..पुन्हा आरडाओरडा करेल,पुन्हा त्याने हात उचलला तर?? काल रात्री मारलं ते अजून ठणकतय.. काय करू?? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात पिंगा घालत होते…
विचार करत ती स्कुटी पाशी येऊन पोचली, सामानाच्या पिशव्या , सगळं नीट ठेवलं, आणि नाईलाजाने घरी जायला निघाली…
तिला एकाच गोष्टीचं समाधान…या मास्क, आणि स्कार्फ मुळे चेहरा झाकला गेलाय, आणि चेहऱ्यावरचे व्रण कुणाला दिसत नाहीयेत.
.Thanks to मास्क कम स्कार्फ😊
(टीप: लॉक डाउन, सगळ्यांसाठी छान असेलच असं नाही)