लेडीज डबा
महिला डब्याच्या जागी.. सगळ्याजणी उभ्या असतात… काही रोजच्याच तर…काही नवीन…
ट्रेन प्लॅटफॉर्म ला टेकते… भराभर सगळ्या डब्यात शिरतात.. रोजची ट्रेन असल्याने बऱ्याच जणी एकमेकींना ओळखणाऱ्या असतात…
स्टेशनात भकास आलेला तो डबा आता विविध रंगांनी सजून जातो. बरं.. ..एक रंग दुसऱ्या सारखा नाही.. एक ड्रेस दुसरी सारखा नाही.. सगळंच वेगळं.. आणि त्यातून अगदी कोणाचं कोणाशी मॅचींग झालंच..(हे होणं दुर्लभ)..पण अगदी झालंच….तर मग पुढच्या वेळेस ठरवून सगळया हाच रंग.. असलंच.. घालूया…या चर्चांना जोर येतो…
आपापल्या जागी सेटल झाल्यावर आदल्या दिवशी जे झालं ते सगळं या आपल्या मैत्रिणींना सांगतेय.. असं यातल्या अनेकींना झालेलं असतं…
यात तऱ्हा पण किती… एखादी दुःखी.. तर एखादी सतत आनंदी.. कोणाकडे चिडका मूड…कोणी दमलेली तर…कोणी चैतन्यमय…😁..सगळे मूड स्विंग्ज झाडून या लेडीज डब्यात जमलेले असतात…
खटक्यात कुठेतरी हशा पिकतो.. ठो करून सगळया खळखळून हसतात..
तर कुठेतरी…. डब्यात एखादा कोपरा आज शांत असतो… त्यांच्यापैकी एखादीच्या घरी प्रॉब्लेम झालेला असतो…. मग ते काहीही असो.. नोकरी गेली, कोणाचं निधन, घरात होणारें वाद.. किंवा आणखी काही…पण म्हणून सगळ्याच शांत असतात…
इथे वाढदिवस, रिटायरमेंट, हळदी कुंकू, होळी, मंगळागौर, केळवण, नवरात्र, अगदी डोहाळे जेवण… नवीन लग्न झालेली असेल तर तिची चेष्टा करुन तिला लाजेने जीव नकोसा करणे.. सारं काही आणि सगळं काही इथे होतं आणि सेलिब्रेट होतं… पण त्याच वेळेस..कोणी अडचणीत असेल तर सगळया मिळून तिला लागेल ती ..मदत करायला सुध्दा पदर खोचून पुढे येतात…
याच डब्यात सगळं काही मिळतं…भाजी, गजरा, साड्या, ड्रेस, कुर्ती, purse, बॅग्स, दागिने, कॉस्मेटिक्स..,इडली, चटणी, उत्तप्पा, मेदू वडा, अगदी टप्परवेअर, oriflame, वगैरे ब्रँडेड वस्तू सुध्दा इथे मिळतात… कुठून कुठे connections जुळतात.. आणि साऱ्या जणी मिसळून जातात…
या डब्यात… कधी कधी एखाद्या बाळाचा सुध्दा जन्म होतो..तर कधी कधी याच डब्यातून उडी मारून..एखादी आपल्या जन्माचा शेवट करते…
कामावर जाताना.. येता जाता… कोणी भाजी निवडत असतं.. तर कोणी.. विणकामाच्या सुया घेऊन मोजे, तोरण, वगैरे विणत असतं…. कधी कधी तर….. काही जणींना आराम सुध्दा याच डब्यात मिळतो…हे त्यांच्या सुखात झोपलेल्या चेहऱ्याकडे बघितलं की जाणवतं…
या लेडीज डब्यात सगळी सुखं दुःख शेअर केली जातात… तर कधी भयानक युद्ध सुध्दा होतात… ती भांडणं सोडवायला बाकीच्या सुध्दा त्यात उतरतात… याचं निष्पन्न कधी कधी भांडण अजून पेटण्यात होतं तर कधी कधी खरंच ते भांडण सामंजस्याने मिटून.. त्यांच्यात मैत्री देखील होते…😁…
शेवटचं स्टेशन जवळ यायला लागतं तसा वाटेतल्या एक एक स्टेशन वर थांबून तो डबा शांत होऊ लागतो .. आणि शेवटच्या स्टेशन वर पुन्हा एकदा तसाच भकास आणि बेरंग होतो…