बाहेरख्याली
“इतकी कशी ग तू निर्ढावलीस, हे सगळं करायच्या आधी आमच्या इज्जतीचा विचार तरी करायचा, स्वतः चं नाव खराब होईल, याची तर तुला पर्वाच नाही, पण किमान माझा तरी विचार करायचा.. की जर याला समजलं तर काय होईल त्याचं,किती वाईट वाटेल त्याला? हा विचार सुध्दा तुझ्या मनाला शिवला नाही.. सुपर ग्रेट आहेस तू.. आणि काय कमी आहे घरात? प्रेम, आदर, पैसा, स्वातंत्र्य, सगळं मिळतंय ना घरात? नक्की प्रॉब्लेम काय आहे तुला? बास्स, तुझ्या या चुकीला माझ्याकडे माफी, सहानुभूती अजिबात नाही.. मला हे नातं यापुढे नकोय.. समजलं… ???”
ती शांत…मान खाली घालून बसली होती…
तो पुन्हा ओरडला..कळतंय का..मी काय म्हणतोय ते.. पुरे आता… खरं तर तुझ्या आईबापांची चूक आहे.. खूप जास्त मोकळीक देऊन ठेवली लेकीला..आणि लेक ही अशी बाहेरख्याली निघाली…
आता ती ओरडली.. बास्स ..आईबापांना मधे आणायचं नाही..
आणि काय चुकलं रे माझं.. आहे मी बाहेरख्याली चल..
त्याशिवाय आणखी कोणता मार्ग उरला होता माझ्याकडे.. 2 वर्ष हात लावला नाहीयेस तू मला.. जवळ घेतोस ,मिठी मारतो.. सोडून देतोस. मी म्हणाले.. थांबला का.. तर उद्या, नंतर, अत्ता नको, मला असं होतंय, आज मूड नाही.. ही तुझी उत्तरं…. माझ्या नैसर्गिक भावना किती दाबून ठेवल्या मी ..कल्पना आहे तुला? नाहीये तुला कल्पना.. नाहीतर तू नक्कीच यासाठी काहीतरी केलं असतं.. बरं मी सगळं केलं..
‘त्या ‘सुखासाठी तुला प्रेमाने विचारलं. डॉक्टर कडे जाऊया का.. विचारलं… कधी कधी…भांडले तुझ्याशी, रडले, भीक मागितली…. यापलीकडे जाऊन उलट माझ्यासोबत नाही..तर आणखी कोणी आवडतं का.किंवा माझ्याविषयी काही राग, किल्मिष, किंवा आणखी काही आहे का मनात..म्हणून माझ्याशी असा वागतोस..इतकं सुध्दा झालं… पण नाही ते ही नाही…मग काय…प्रॉब्लेम तुझा काय आहे ते सांग..
माझ्या जागी तू असतास तर? 2 वर्ष थांबला नसतास तू.. कळलं ना.. गेला असतास 6 महिन्यात बाहेर स्वतः ची भूक भागवायला….. आणि वर त्याचं समर्थन सगळ्यांनी केलं असतं.. काय करणार बिचारा.. घरी ‘ जेवायला ‘ मिळत नाही मग बाहेर जाणार ना.. अशी सहानुभूती मिळाली असती तुला..
पण हे माझ्याकडून झालं तर मी..वाया गेले..का ? मला शारीरिक गरज नाही? फक्त तुलाच आहे? आणि तुला आहे तर मग का होत नाही काही? शपथा घेऊन सांगतोस . माझं बाहेर काही अफेयर वगैरे नाही.. फक्त तूच आहेस आयुष्यात..मग होत का नाहीये काही..का जळते आहे मी आतल्या आत..?
आता कोणाला पर्वा नाहीये ..दे ना उत्तर…बोल.. आता कोणाला दोष देशील…
आता तो शांत मान खाली घालून बसला होता…
शेवटी इतकंच म्हणाली… जे msgs तू वाचलेस..ते माझ्या मैत्रिणीने पाठवले आहेत.. आम्ही सगळं ठरवून केलं आहे.. मुद्दाम… मी कुठेही तुझ्या भाषेत… शेण खाल्लं नाहीये अजुनतरी..पण माझ्यावर हे खरं घडवून आणायची वेळ येऊ देऊ नकोस… 2 वर्ष थांबले आहे….पण आता मात्र मी माझी खात्री देऊ शकत नाही…