आईपण

आईपण
“कंटाळा आलाय आता.. सारखं तेच तेच, रात्री जागरण, त्यात हे कंबरेचं दुखणं, कुठे जायला मिळत नाही, नोकरी करता येत नाही.. इतक्या लहान बाळाला पाळणाघरात सुध्दा ठेवता येणार नाही… घरातला पसारा आवरला जात नाही. कितीही करा,कामं संपतच नाहीत.. स्वतःकडे बघायला वेळ नाही… कसलं वाचन नाही….. काहीच नाही…”

सगळं इथे याच्यापाशी थांबलं.. माझं संपूर्ण आयुष्य स्टॉप झालंय..या एका निर्णयामुळे… का इतक्या लवकर मी आई व्हायचा निर्णय घेतला..शी.. .. नकोच होतं मला..पण.. नवरोबा….जेव्हा गोड बातमी समजली..तेव्हा अगदी आनंदाने डोक्यावर घेतलं होतं घर.. बाळाच्या जन्मानंतर सगळं मी बघणार.. मी झोपवणार.. मी अंघोळ घालणार..सगळं अगदी तोऱ्यात बोलला होता.. मला हायसं वाटलं होतं…

पण प्रत्यक्षात काय.. एकदा का सकाळी ऑफिस ला गेला की… थेट…. संध्याकाळी उशिरा उगवतो.. आल्यावर पण बॉस बरोबर एखादा कॉल ठरलेला असतो.. मग कसं काय झोपवणार हा बाळाला.. कशासाठी वेळच नाही… काही सांगायला जावं तर तेही नाही…

“का कोणी समजून घेत नाहीये मला.. सगळं मीच एकटीने का करायचं..कंटाळा आलाय मला.. सगळं सोडून निघून जावं असं वाटतं कधीतरी..पण इतकी कठोर सुध्दा मी नाहीये….”.

पाळण्याकडे बघत ..तिच्या मनात हे असंख्य विचार येऊन गेले.. दुपट्यात गुंडाळलेला तो जीव. ..तिला त्रासदायक वाटत होता.. याच्यामुळे माझं करिअर थांबलं… याच्यामुळे शून्यावर आले मी…

तितक्यात पाळण्यात हालचाल झाली.. अळोखे पिळोखे देत….त्या एवढ्याशा जीवाने… तोंडाचं बोळकं उघडून छोटीशी जांभई दिली… आणि तिच्याकडे बघितलं.. तिला बघताच..पुन्हा एकदा बोळकं उघडून गोड हसलं…त्याला असं बघताच तिला एकदम भरून आलं..

“किती विश्वास किती प्रेम आहे नजरेत.. अख्ख्या जगात..कोणाच्या हि नजरेत हे मला दिसलं नाही.. कदाचीत दिसणार पण नाही..”

अत्यंत प्रेमाने तिने बाळाला उचलून छातीशी कवटाळलं……. आणि तिथेच एका आईचा जन्म झाला.

संबंधित कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!