मिसळ आणि कोरोना
मॉर्निंग शिफ्ट … वर्क फ्रॉम होम, …कॉल्स, इमेल्स, रिमाइंडर,मीटिंग, इमेल मधून बॉस ची फोडणी.. अशी गडबड सुरू होती… नेमका सोमवार, मंडे ब्लूज, काम करायची अजिबात इच्छा नसते आणि नेमकं अशा वेळेस लॉग इन केल्यापासून फक्त कामच काम येत राहतं, असा हा सोमवार…
तो सकाळी उशिरा उठला, नाश्त्याला काय असा रोजचा कंटाळवाणा प्रश्न त्याच्या रुपात तिच्या समोर येऊन उभा राहिला.. ती महत्त्वाचे काम करत होती आणि त्यात भर म्हणून याची गुणगुण, सांग ना ग, नाश्त्याला काय करायचं, ती म्हणाली, हे बघ आज मला त्याविषयी विचार करायला वेळ नाही,त्यापेक्षा तू पटकन काहीतरी घेऊन ये.
तो एका पायावर तयार, बाहेरून आणायचं म्हणजे मिसळ ठरलेलीअसते.. पटापट स्वारी खाली उतरली, आणि 10 मिनिटात मिसळ आणि 2 एक्सट्रा पाव घेऊन हजर..
चल चल, पटकन ब्रेक घे ग, पटकन खाऊन घेऊ,चल, चल, … पुन्हा भुंगा गुणगुण करायला लागला,
दोघे साग्रसंगीत मिसळ खायला बसले, तो मजेत खात होता, तिला मात्र उचक्या, नाकातून पाणी, सुरू झालं, तो तिच्यासाठी कमी तिखट मिसळ आणायला विसरला, त्याने दोन्ही नॉर्मल मिसळ आणल्या, ती वैतागली, नकोच मला खायला, इतक्या वेळा सांगितलं आहे, आणि तुला माहीत आहे, तरी कसा काय विसरतोस तू, इत्यादी इत्यादी वगैरे सुरू झालं, तो गुपचूप खाली मान घालून मिसळ चेपत होता, हे बघून ती अजून चिडली.. आणि रागावून खुर्चीवर जाऊन लॅपटॉप समोर बसली…
पोटभर मिसळ चेपल्यावर तो हळूच तिला म्हणला, अग, तुला मिसळ खाऊन नाकातून पाणी आलं, उचकी लागली, अग मान्य आहे मी विसरलो, पण जमेची बाजू ही आहे, की तुला चव समजतेय, तिखट वगैरे समजतंय तुला, हे चांगलं लक्षण आहे ना,ते बघ ना, उगाच माझ्यावर चिडतेस….
ती फणकारुन म्हणाली, उगाच तुझी चूक त्या कोरोनाच्या नावावर खपवू नकोस.जा तू इथून..आणि डोकं हातात धरून डोळे गच्च मिटून बसली….4-5 मिनिटे काहीच हालचाल जाणवली नाही म्हणून तिने हळूच डोळे उघडून बघितलं तर हातात तिच्या आवडीचं मँगो आईसक्रीम घेऊन तो उभा होता..
ती : सक्काळी सक्काळी कोण आईस्क्रीम खातं का..
तो: अग, खा, त्या निमित्ताने तुला आईस्क्रीम ची चव समजते की नाही हे पण समजेल, असं म्हणून त्याने डोळे मिचकावले,आणि म्हणाला…तुला पटकन कांदेपोहे करून देऊ….खाशील??
तिचा राग मँगो आईस्क्रीम सोबत विरघळून गेला ….
टीप: नॉर्मल मूड मध्ये पोस्ट चा आनंद घ्यावा, उगाच सिरीयस होऊ नये, कोरोनाचे गांभीर्य मला पण समजते, तेवढी संवेदनशील मी आहे, परंतु टेन्शन घेऊन कोरोना जाणार नाहीये हे सुध्दा लक्षात असू द्यावे..