बापमाणूस
त्याने हाताशी असलेल्या बेलच्या आधाराने मुलाला हाक मारली आणि उठायचं आहे असे क्षीण आवाजात सांगितले…..मुलाचा आधार घेऊन तो उठून बसला..अजूनही उठता बसताना आधार लागत होता.. महिन्याभरापूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका येऊन गेला होता…जास्त परिणाम पायांवर झाला होता.. थोडक्यात काय तर म्हणावं तितकं सगळं काही बरं झालं नव्हतं…
पण त्याला मात्र त्याचा स्वाभिमानी स्वभाव त्रास देत होता.. हातपाय धड असेपर्यंत त्याने सतत काही ना काही काम केलं,
कधीच कोणावर अवलंबून राहायची वेळ त्याच्यावर आली नाही. शून्यातून घर ,संसार, उभा केला होता…मुलांची शिक्षणं,लग्न …,सगळं सगळं स्वबळावर केलं होतं, प्रसंगी कर्ज घ्यावं लागलं पण ते सुद्धा व्याजासमेत त्याने चुकतं केलं होतं…
.आणि आता मात्र अचानक उद्भवलेल्या या दुखण्याने त्याच्यावर बंधनं आली होती…इतकी वर्ष स्वावलंबी असलेला माणूस आता साधं स्वतःहून उठून बसू शकत नव्हता..
सगळं चित्र डोळ्यासमोरून सरकत होतं…मनात विचार सुरू होते..आपला मुलगा आणि मुलगी दोघांना आपण जड नाही..बिचारे दोघे स्वतःचे सगळे व्याप सांभाळून माझं पण काय हवं नको ते बघतात..मला कधीच एकटेपणा जाणवू दिला नाही…त्यांना जोडीदार देखील समजूतदार लाभले आहेत….सगळे आपापल्या आयुष्यात आता सेटल आहेत…
आता अजून काय हवं आयुष्यात..पण फक्त हे असं परावलंबी आयुष्य नको.. माझ्या पोरांवर ओझं बनून राहणं मला जमणार नाही…ही सुद्धा माझ्या आधी पुढे निघून गेली..ती गेल्यापासून जगणं कमी आणि दिवस रेटणं सुरू आहे…..
घशाला कोरड पडली..पाणी हवंय.. औषधांची पण वेळ झाली आहे…तो भानावर आला , मुलाला बेल दाबून हाक मारणार तितक्यात,. त्याला हाताशी असलेल्या पाण्याच्या बाटलीच्या बाजूला टेबलावरच काहीतरी दिसले आणि त्याचे डोळे चमकले..
खोलीतून काही हालचाल न जाणवल्याने मुलगा त्याच्या खोलीत आला…आणि मटकन खाली बसला…
टेबलावर असलेली झोपेच्या गोळ्यांची बाटली रिकामी होती…
आणि बेड वर तो…..बापाचे कर्तव्य बजावून .. समाधानाने चिरनिद्रेच्या आधीन झाला होता….